जामनेर (प्रतिनिधी) दोघांच्या अत्याचारातून गर्भवती गतिमंद महिलेचा अनधिकृत गर्भपात केल्याचा संतापजनक प्रकार जामनेर तालुक्यात घडला आहे. महिला दक्षता विभागाकडे केलेल्या निनावी तक्रारीमुळे हा प्रकार उघड झालाय.
या संदर्भात अधिक असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात दोघांनी वारंवार केलेल्या अत्याचारातून गतिमंद महिला गर्भवती राहिली होती. आईला शंका आल्याने सदर महिलेची जामनेर येथील एका स्त्रीरोग व प्रसूती तज्ञाकडून तपासणी केल्यामुळे याबाबतचे बिंग फुटले. तसेच पिडीत महिला २२ आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कुठेही वाचता न करता, महिलेची आई व भावाने वाघारी येथील होमिओपॅथीची पदवी घेतलेल्या एका महिला डॉक्टरकडून ६० हजार रुपयात अनधिकृत गर्भपात करून घेतला.
दरम्यान, या प्रकाराबाबत गावातीलच कुणीतरी जिल्हा महिला दक्षता कमिटीकडे निनावी चिठ्ठी पाठवून चौकशीची मागणी केली. प्राप्त चिठ्ठीवरून महिला दक्षता समितीने पहूर पोलिसांची मदत घेत शनिवारी तपासणी करणारे स्त्रीरोगतज्ञ, गर्भपात केलेले ठिकाण, गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरांची घटनास्थळी जाऊन चौकशी केली. याप्रकरणी सदर महिलेच्या भावाने पहूर पोलिस ठाण्यात जबाब दिला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पीसीपीएनडीटी समितीने याबाबत चौकशी केली. याबाबतचे वृत्त आजच्या ‘दिव्य मराठी’ ने दिले आहे.