जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या असून त्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभल्याने जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. याचे फलीत म्हणून जिल्ह्यातील सक्रिय रूग्ण संख्या प्रथमच ४५ वर आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या १ लाख ४२ हजार ६२८ रुग्णांपैकी १ लाख ४० हजार ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्क्यांवर पोहोचले आहे. शिवाय जिल्ह्यातील पंधरापैकी सात तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या शून्य आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असली तरी यापुढेही नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) होण्यासाठी आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनासह विविध यंत्रणांनी घेतलेल्या परिश्रमामुळे अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या. बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या असून जिल्ह्यात आजपर्यंत १४ लाख ५२ हजार २६७ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी १ लाख ४२ हजार ६२८ अहवाल पॉझिटीव्ह तर १३ लाख ७ हजार २३८ अहवाल निगेटिव्ह आले आहे. सध्या ४८७ अहवाल प्रलंबित असून जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी झाला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३५ व्यक्ति होम क्वारंटाईन असून १० व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४५ रुग्णांपैकी ३५ रुग्ण लक्षणे नसलेले तर १० रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी ३ रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 3 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.