मुंबई (वृत्तसंस्था) देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (5 State Assembly Election) कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं मत मांडलं. अतिआत्मविश्वास म्हणजे भाजपला मोकळं रान देण्याचा प्रकार आहे, असं ते म्हणाले.
“विरोधीपक्षामध्ये एक्य नसल्याने भाजपला फायदा होणार असल्याची मला भीती वाटते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगतात संजय राऊत गोव्यात येऊन काय करतात? मी विरोधी पक्षांना समजविण्याचा प्रयत्न करतो. काँग्रेस नेते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी माझं बोलणं सुरु आहे. माझं आता नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत बोलणं झालं. एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. अतिआत्मविश्वास म्हणजे भाजपला मोकळं रान देण्याचा प्रकार आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.
“गोव्यात महाविकास आघाडीचं सरकार कधी स्थापन होईल? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी भूमिका मांडली. “आमची इच्छा आहे, काँग्रेसची इच्छा पाहिजे. राहुल गांधींची सुद्धा इच्छा आहे. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची इच्छा आहे का? त्यांची काही वेगळी भूमिका दिसतेय जे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगत आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“पाच राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा झाली आहे. मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो की, ते योग्य वेळेत निवडणुकीचं नियोजन करत आहेत. देशाची सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये ज्याप्रकारे कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्याबाबत निवडणूक आयोगाने खरंच काहीतरी अभ्यास केलेला असेल. लोकशाहीत निवडणूक वेळेवर होणं आणि वेळेवर निवडणूक घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपलं निवडणूक आयोग सक्षम आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमावली कोड ऑफ कंडक्टसाठी लावण्यात आली आहे. मला वाटतं ही नियमावली प्रत्येक राज्यासाठी असली पाहिजे. फक्त विरोधी पक्षांसाठी नियमावली लावू नये. विशेषत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील त्यांना मोठी रॅली घेण्यापासून रोखता यायला हवं. जेव्हा पंतप्रधान रॅली करण्यासाठी जातात तेव्हा जास्त गर्दी होते”, असं संजय राऊत म्हणाले.