चेन्नई (वृत्तसंस्था) गेल्या महिन्याभरात देशात निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा आणि सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यावरून सुरू असलेला खटला त्याचंच द्योतक ठरू लागलं आहे. अशातच ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मूळचे महाराष्ट्राचे असणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन झालं आहे. डॉक्टर काकडे यांनी ऑक्सिजनवर मोठं संशोधन केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्या नावावर ७ पेटंट देखील होते.
ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते.
डॉ. भालचंद्र काकडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नई इथल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.
डॉ. काकडे हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्याच्या एका लॅबमध्ये त्यांनी संशोधनाचं काम केलं. पुढे जपानच्या टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते काही काळ कार्यरत होते. चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये ते वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू होते. आपल्या संशोधनाच्या जोरावर त्यांनी ७ पेटंट आपल्या नावावर केले आहेत.