पाचोरा (प्रतिनिधी) सातबारा उतार्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी एक हजार 360 रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कारवाई बांबरूड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली.
लासगाव येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असून त्यांनी एक लाख 30 हजारांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उतार्यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) याने तक्रारदाराकडे एक हजार 360 रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बांबरूड येथे आरोपीच्या घराजवळ भगवान कुंभार याला लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली. हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन.एन.जाधव व सहकार्यांनी सापळा यशस्वी केला.