पाचोरा (प्रतिनिधी) अवघ्या दोन दिवसांपुर्वीच सुट्टीवर आलेल्या भुषण आनंदा बोरसे (वय ३४) या एसएसबी मध्ये जवान शेतातून घरी जात असतांना त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये जवानाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना भातखंडे खुर्द येथील शेतशिवारात सायंकाळी घडली. या घटनेमुळे बोरसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील भुषण आनंदा बोरसे हे बिहार येथे एस. एस. बी. मध्ये सेवा बजावत होते. दिवाळीसाठी ते सुट्टी घेवून दोन दिवसांपुर्वी घरी आले होते. नवरात्रोत्सव सुरु असल्याने भुषण बोरसे हे दि. ९ ऑक्टोबर रोजी पत्नीसह पेंडकाई मातेच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास ते भातखंडे खुर्द शिवारात असलेल्या शेतात यांचे वडिलांना मदत करण्यासाठी व गेले होते. अचानक ढगाळ वातावरण तयार होवून विजांचा कडकडाट होवू लागला.
दरम्यान, भुषण बोरसे यांनी वडिलांना बैलगाडी जुपुंन देत ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. वडील बैलगाडीवर तर भुषण बोरसे हे दुचाकीने घरी जात होते. विजांचा कडकडाट वडीलांच्या डोळ्यादेखत मुलाच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याचे दिसताच वडीलांनी शेतातच हंबरडा फोडीत आक्रोश केला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.