अमळनेर (प्रतिनिधी) ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पाडळसरे धरणाचे भूमीपूजन केले होते. म्हणूनच गेली पाच वर्षे या धरणाचे काम झाले नाही. त्यामुळे खडसे यांचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भूमिका भाजपची होती की काय?, अशी शंका येतेय. परंतू आमदार अनिलभाईदास पाटील या धरणाच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे ज्यांच्या हस्ते धरणाचे भूमीपूजन झाले, त्याच खडसे यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन केले जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दिली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थिती लावली, यावेळी ते बोलत होते. २०१९च्या निवडणुकांदरम्यान या भागात अनिलभाईदास पाटील यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो तर पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडीची सत्ता येईल, मी जलसंपदा मंत्री होईल याची कल्पना देखील नव्हती, मात्र योगायोगाने ही जबाबदारी माझ्यावर आली. असे जयंत पाटील म्हणाले.
अमळनेर तालुक्यात निम्न तापी प्रकल्पाला जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, अनिलभाईदास पाटील, मा.आ. मनिष जैन, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.