जळगाव (प्रतिनिधी) अपघातग्रस्त वाहन सोडविण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारतांना पोलीस कोठडीत असलेला पो.कॉ. सुमीत पाटीलला आज न्यायालयाने २५ हजाराच्या जात मुचलक्यासह अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.
तालुक्यातील पाळधी येथील पोलीस स्थानकात कार्यरत सुमीत पाटील या पोलिस कॉन्स्टेबलला एसीबीच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली होती. न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने २५ हजाराच्या जात मुचलक्यासह अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवसांपूर्वी अपघात होवून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चारचाकी वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी गुन्ह्यातील वाहन सोडण्यासह आरोपी चालकाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पो.कॉ. सुमीत पाटील यांनी लाच मागितली होती. मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली होती. आरोपीतर्फे अँड. गोपाळ जळमकर आणि अँड.कुणाल पवार यांनी तर सरकारपक्षातर्फे अँड.भारती खडसे यांनी काम पहिले.
















