मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद गमवावे लागले आहे. दरम्यान, अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे. याचप्रकरणी परमबीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.
मनसुख यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती असं सांगितलं होतं.
मात्र मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचे प्रकरण तापल्यानंतर या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते. तसेच यादरम्यान मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याने हे प्रकरण अधिकच तापले होते. त्यातच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यावर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांना अखेर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.