मुंबई (वृत्तसंस्था) माजी IPS अधिकारी ज्युलियो रिबेरो यांनी परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत तपास करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. आपल्याला ऑफर देण्यात आली तरी हे काम करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. “अशा गोंधळलेल्या परिस्थितीला मी स्पर्श करु इच्छित नाही. ही अत्यंत अवघड परिस्थिती असून या सगळ्याचा शेवट कुठे घेऊन जाईल हे मला माहिती नाही. त्यामुळे राजकारण्यांनीच यावर तोडगा काढून परिस्थिती पूर्ववत करणं योग्य आहे, अशी प्रतिक्रिया ज्युलिओ रिबेरो दिली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत शंका उपस्थित केली असून उचलबांगडी करण्यात आल्यानंतरच आरोप का केले? अशी विचारणा केली आहे. शरद पवार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते असं सुचवलं होतं. त्यावर ज्युलिओ रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी IPS अधिकारी ज्युलियो रिबेरो यांनी परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत तपास करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. मला या घटनेचा तपास करायचा नाही. मला अद्याप याबाबत कोणतीही विचारणा झालेली नाही. शरद पवार यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली तपास व्हावी, असे फक्त सुचविले होते. पण आता मी ९२ वर्षांचा आहे. या वयात मी तपास करु शकणार नाही. माझ्यात तेवढी ताकद नाही. अंगात तेवढी उर्जा असती तरी मी याप्रकरणाची चौकशी केली नसती. कारण, या माध्यमातून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केली.
“परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासातील गोपनीय माहिती उघड होणे हा मुंबई पोलिसांचा गलथानपणा ठरतो. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते,” असं शरद पवार रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला. या पत्राचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, परमबीर यांनी दावा केलेले १०० कोटी नेमके कोणाला मिळाले, त्याचा तपशील त्यांनी पत्रात दिलेला नाही.
दुसरीकडे ज्युलिओ रिबेरो यांनी पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन हे थांबवावं सांगण्याची गरज होती, जर गृहमंत्र्यांनी नकार दिला असता तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. एक प्रामाणिक आणि सरळमार्गाने चालणाऱ्या अधिकाऱ्याने हेच केलं असतं असंही सांगितलं. ९२ वर्षीय ज्युलिओ रिबेरो १९८२ ते १९८६ दरम्यान मुंबई पोलीस प्रमुख होते. यानंतर ते गुजरात आणि पंजाबमध्ये आयुक्तपदी होते. आपल्या कार्यकाळात अशी कोणतीही गोष्ट घडली नव्हती असं ते म्हणाले आहेत.