परभणी (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सक्रीय होत असताना पाहायला मिळत आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झालं. परंतु, त्यानंतर मात्र पावसाने काही काळ दांडी मारली. परभणीत गेल्या चोवीस तासांत तब्बल २३२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय. परभणी जिल्ह्यात काल अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला असला तरी जिल्ह्यातील शिरसी बुद्रुक या गावातील तब्बल २३२ मेंढ्या असलेला एक कळप वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
परभणी हा तसा कोरडा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण इथं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू तीव्र असतात. नाही पडला तर पाऊसच पडत नाही आणि एकदा पडायला लागला तर थांबत नाही असे प्रसंग इथं अनेक वेळेस घडतात. त्याचीच पुन्हा प्रचीती आलीय. २४ तासात तब्बल २३२ मिमी. एवढ्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झालीय. विशेष म्हणजे हा पाऊस जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आहे.
हवामान विभागाने कालच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यातच पहिल्याच दिवशी परभणी जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्हाभरात गेल्या २४ तासात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या तीन दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.