चाळीसगाव (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला जिवेठार मारणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी शहरातील शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसीलदारांना करण्यात आली आहे.
पारोळा तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय तरुणी ही पारोळा येथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती. दिवाळीच्या सुट्टीत पारोळा येथे वास्तव्याला असलेल्या आपल्या मामाकडे ३ नोव्हेंबर पासून आली असता दि.७ रोजी दुपारी अडीच वाजता मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली पण बराच उशीरापर्यंत घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेता तिचा तपास न लागल्याने तिच्या मामांनी पारोळा पोलीस ठाण्यात दि. ८ रोजी सकाळी दहा वाजता ती हरवल्याची तक्रार केल्यानंतर दि.८ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ती जुलूमपुरा येथे मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी याठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांनाही मुलगी दिसली. त्यांनी लगेच मोटारसायकलीने तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असता प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तीन दिवस तिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिची प्राणज्योत मालवली.
तिच्या शवविच्छेदनानंतर सदर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले असल्याने सदर तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना जलद न्यायालयात केस चालवून फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी चाळीसगाव तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी महिला आघाडीच्या उप-तालुकाप्रमुख सविता कुमावत, अनिता जाधव, सविता मोरे, सुनीता पवार, ज्योती गवळी, वंदना जाधव, अश्विनी जाधव, कोमल जाधव, माधुरी सोनवणे, प्रतिभा सोनार यासह आधी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.