बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील चौसाळा बायपास जवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.२३) रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात वाशी तालुक्यातील दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अध्यक्ष अमोल बाबुराव बोडके ( ३०, रा. बनगरवाडी ता. वाशी) व अॅड.अजित भैरट (४२, रा. विजोरा, ता. वाशी), अशी मयतांची नावे आहेत.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची २३ मे रोजी निवडप्रक्रिया होती. या प्रक्रियेसाठी तालुक्यातील बनगरवाडी येथील काँग्रेसच्या ओबीसी सेलचे वाशी तालुकाध्यक्ष अमोल बोडके व राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी अॅड. अजित भैरट हे दोघे जीवलग मित्र सकाळपासून तिथे उपस्थित होते. सभापती, उपसभापती निवडीनंतर दोघेही आनंदोत्सवात सहभागी झाले. त्यानंतर दोघं जण आपापल्या कामासाठी गावात निघून गेले.
सायंकाळी काम आटोपल्यावर दोघंही जण आपल्या दुचाकीवरून गावाला पोहचले. त्यानंतर पुन्हा ते कामानिमित्त पारगावकडे गेले. त्यानंतर ते धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने आपल्या गावाकडे परत निघाले. परंतू बायपासनजीक पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (क्र. एमएच २५ एडब्ल्यू ८१०४) त्यांच्या दुचाकीला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघे वीस फूटांवर जाऊन पडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील अॅड. भैरट व बोडके हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी बीड येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे या अपघातात कार चालकही जखमी झाला आहे. दोघांच्या मृत्यू वार्ता कळताच कुटुंबियांसह मित्र मंडळीने एकच हंबरडा फोडला. दरम्यान, अजित यांचा दीड ते दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तर अमोल यांना दोन लहान मुले आहेत.