नवी दिल्ली (वृत्तसंस्था) योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’नं केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये वादग्रस्त ठरलेल्या कोरोनिल किट विकत तब्बल २४१ कोटी कमवले आहेत.
कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार कंपनीकडून करण्यात आला होता. रामदेव बाबा आणि ‘पतांजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी २३ जूनला या औषधाची घोषणा केली. हे औषध कोरोनावर खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध असा दावा केल्यामुळे हे औषध वादात सापडले होते. यापूर्वी ‘पतंजली’ने ‘कोरोनिल’ या नावाचा वापर केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायायलयाने कंपनीला १० लाखांचा दंड केला आहे. तसेच कंपनीने या शब्दाचा वापर बंद करण्याचा आदेशही कंपनीला दिला होता. परंतू तरी देखील कोरोनिल किट ८५ लाखांहून अधिक विकत पतंजलीने तब्बल २४१ कोटी कमवले आहेत.