जळगाव (प्रतिनिधी) राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्याच्या सहकार खात्याने जिल्हा बँकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. कोरोना नियमांचे पालन करून राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आल्याने जेडीसीसीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी मुदत संपूनही राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही. या निवडणुकांना दुसऱ्यांदा मार्च अखेरीस मुदतवाढ दिली होती. यानुसार ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापि, सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्याच्या सहकार खात्याने जिल्हा बँकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत मुदत संपलेल्या १३ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या १३ बॅकांमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश असल्याने या बँकेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबतच जळगाव जिल्हा दूध संघ, ग. स. सोसायटी, मराठा विद्याप्रसारक मंडळ आणि जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणुकाही लवकरच होणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत घडामोडीस प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.