सांगोला (वृत्तसंस्था) ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, अशा शब्दात शिवसेना नेते आणि मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे तसंच महाविकास आघाडी सरकारचं कौतुक केलं आहे. सांगोला येथे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसेन्स लागते हे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केलं तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सुरु आहे, असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.