बोदवड (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवाचे उदघाटन संस्थेचे सचिव विकास कोटेचा व सुजाता विकास कोटेचा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना संस्थेचे सचिव विकास कोटेचा यांनी गुणकारी रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्यांचे विशेष महत्त्व आहे, असे सुजाता विकास कोटेचा मत व्यक्त केले केले.
रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची गरज असल्याचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी बोदवड महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना नमूद केले. पावसाळ्यातील सर्वात मोठं आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानभाज्या. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या तसेच अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या म्हणजे हिरवं धनच .या भाज्या स्वादिष्ट तर असतातच त्याचबरोबर आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक व त्रिदोष हारक देखील असतात. सुदृढ आरोग्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरते.म्हणूनच आपल्या परिसरातील विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचा उपयोग व गुणधर्मांची माहिती सर्वांना व्हावी तसेच अनेक दुर्मिळ व लुप्त होत असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने गो ग्रीन क्लब अंतर्गत दरवर्षी “पावसाळी रानभाज्या महोत्सवाचे” आयोजन करण्यात येते ,असे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गीता पाटील यांनी सांगितले.यावर्षी देखील बुधवार २८ ऑगस्ट रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी , जामनेर येथील माजी सैनिक तसेच श्री सद्गुरु व नागदेवता हॉटेलचे संचालक किशोर पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी रानमेवा पाककृती स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मशरूम, दुडी चे फुल, कुरडू, मायाळू, कटुरले, अंबाडी, फांग, अळू , शेवगा , गुळवेल अशा अनेक रानभाज्यांच्या विविध पाककृतींनी सर्वांचे लक्ष वेधले. यात फांजीचे पराठे व वडे, अळूच्या वड्या,अंबाडीची भाजी, चटणी, पूरी व धपाटे, अंबाडी पासून बनवलेला ढोकळा, कटूरल्याचा पिझ्झा, गुळवेलची चटणी, दूडी च्या फुलांची तसेच मशरूम ची भाजी,शेवग्याच्या पानांचे वडे व पराठे असे अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ या महोत्सवात ठेवण्यात आले होते.
सर्वांनी महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची चव चाखून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण जामनेर येथील किशोर पाटील व राधिका अग्रवाल यांनी केले. प्रथम क्रमांक करिश्मा तेली हिने तर द्वितीय क्रमांक खुशी फाटे हीने तर तृतीय क्रमांक मानसी माळी हिने पटकावला . अपूर्वा पाटील हीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रत्ना जवरास ,डॉ. वंदना नंदवे, नितेश सावदेकर, अजित पाटील,जितेंद्र बडगुजर ,अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले.