मुंबई (वृत्तसंस्था) पेगासस हेरगिरी प्रकरणावरून संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात सूर ऐकू येत आहे. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर ट्वीटमधून निशाणा साधतानाच सामान्य जनतेला देखील इशारा दिला आहे. पेगाससच्या मुद्दयावर केवळ राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकारांना नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनाच सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सर्वसमान्यांना हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. केंद्र सरकार तुमचे व्हॉट्सअॅप, एसएमएस, तु्म्ही पाठवलेले व्हिडिओ, फोटो, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, तुमची पेमेंट हिस्ट्री आणि तुमचे कॉन्टॅक्ट अशा सर्व गोष्टी वाचत आहे, माहिती घेत आहे. तेव्हा पेगॅसस हे केवळ राजकारणी किंवा पत्रकार अथवा सामाजिक कार्यकर्त्यांशीच संबंधित आहे असे नाही, तर ते तुमच्याशी देखील संबंधित आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हा आरोप केला असला तरी केंद्र सरकारने मात्र अशा प्रकारचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या आरोपाला कोणताही ठोस आधार किंवा पुरावा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.