नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “राष्ट्रपतींचं भाषण भारतातील १३० कोटी नागरिकांच्या संकल्पशक्तीचा परिचय आहे. “जेव्हा ब्रिटीश भारत सोडून गेले तेव्हा भारताला कधीही कोणी राष्ट्र बनवू शकणार नाही असं म्हणाले होते. पण भारतवासीयांनी ही शंका खोडून काढली. आपण जगासाठी आशेचा किरण म्हणून उभे राहिलो आहोत. अनेक निवडणुका झाल्या, सत्ता परिवर्तन झाले. लोकांनी नवीन सत्ताबदल स्वीकारले आणि लोकशाही बळकट केली,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
संकटाच्या काळातही हा देश कसा आपला मार्ग निवडतो आणि यश मिळवत पुढे चालत राहतो हे सर्व राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितलं. त्यांचा प्रत्येक शब्द देशवासियांमध्ये विश्वास निर्माण करणारा आहे. त्यांचे आभार जितके व्यक्त करु तितकं कमी आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. मोदींनी यावेळी महिला खासदारांचं विशेषकरुन अभिनंदन केलं. “स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक देशाला एक संदेश द्यायचा आहे, जो त्याला पोहोचवायचा असतो. प्रत्येक देशाचं एक मिशन असतं ते पूर्ण करायचं असतं. प्रत्येक देशाची एक निती असते जी प्राप्त करायची असते असं सांगितलं होतं. कोरोना संकटात भारताने स्वत:ला सांभाळलं आणि इतरांना मदत केली. भारताने आत्मनिर्भर होऊन एकामागोमाग एक अनेक पावलं उचलली,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“जगाने ज्याप्रकारे संकट झेललं आहे त्यानंतर अशा स्थितीत भारत जगापासून दूर राहू शकत नाही. आपल्याला एक महत्वाचा देश म्हणून पुढे यायचं आहे. फक्त लोकसंख्येच्या आधारे आपण हे करु शकत नाही. नवीन वर्ल्ड ऑर्डरसाठी भारताला सशक्त व्हावं लागेल. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. आत्मनिर्भर होण्यासाठी जे बदल आवश्यक आहेत ते करावे लागतील असंही त्यांनी सांगितलं. “कोरोना संकटात एका अज्ञात शत्रूविरोधात आपण लढत होतो. मोठ्या देशांनी गुडघे टेकले असताना भारतात काय होईल याबाबतही शंका निर्माण केली जात होती. पण लोकांच्या शिस्तीमुळे आपण जगाला करुन दाखवलं आहे. आपण घऱात बसून आपल्या त्रुटींसोबत लढू, पण विश्वासाने सामोरं जाण्याचा निर्धारही केला तरच जग स्वीकार करेल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडी, एमएसपी बंद झालेलं नाही
आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीच्या माहितीचे शिकार झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. “कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडी, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.