मुंबई (वृत्तसंस्था) ‘मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या विरोधात उठणारा आवाज दाबण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
काल भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त केलाय. ‘मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या विरोधात उठणारा आवाज दाबण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो! डांबरीकरणानंतर केवळ १२ तासांत पुन्हा खड्डे पडले तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे’, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केलीय.
‘गेल्या २४ वर्षांत मुंबई महानगरपालिकेने रस्ते आणि खड्डे यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २१ हजार कोटी खर्च केले आहेत आणि तरीही प्रवाशांचे दरवर्षी तेच हाल होत आहेत. कारण महानगरपालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने जनतेच्या करातून आलेल्या निधीला खड्डा पाडण्याचे काम सुरु आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्यामुळेच मुंबई महानगरपालिका जरी तब्बल ४२ हजार खड्डे भरल्याचा दावा करत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे खड्डे भरलेच गेले नाहीत किंवा झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. हिंदमाता पुलावरील खड्डे एका दिवसात जैसे थे होतात, यातून हेच स्पष्ट होते’, असा घणाघात पाटील यांनी केलाय.