जळगाव (प्रतिनिधी) अजून २३ मंत्री शपथ घेणे बाकी आहे. त्यात पंकजा मुंडे यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना मोठेपद मिळू शकते, असे वक्तव्य कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई झाली हे मान्य आहे असे सांगत त्यांनी थोडीफार नाराजी असतेच मात्र ती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालादेखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या विषयांवर टीका केली. मंत्रिमंडळात पहिल्याच विस्तारात स्थान देण्यात आलेल्या भाजपच्या गिरीश महाजन यांनी खातं वाटप आणि पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान केलं आहे. मंत्री महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला असून, १७ ऑगस्टच्या अधिवेशनापूर्वी खाते वाटप होणार आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने नाराज असलेल्या पंकजा मुंडेंबाबत विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडेंना मोठं पद मिळेल, पक्षश्रेष्ठी विचार करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्ताराला नक्कीच उशीर झाला आहे. मात्र, आता खाते वाटपला उशीर होणार नाही. स्वातंत्र्य दिनासाठी आम्हाला सर्वांना झेंडावंदन करण्यासाठी जिल्हा वाटप करून देण्यात आले आहे. खाते वाटपासाठी आता निश्चित असं काही सांगता येणार नाही. मात्र, विस्तार झाला असून, 17 ऑगस्टला अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी खाते वाटप होऊ शकते. कारण, अधिवेशनामध्ये मंत्र्यांना त्या विभागाशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरं देखील द्यावी लागणार आहे. तसेच त्याचा अभ्यासह करावा लागेल. त्यामुळे मला नाही वाटतं की खाते वाटपाला जास्त उशीर होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच योग्य निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले महाजन
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडेंनी ‘पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल. मात्र, जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील,’ या भावना व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यावर यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्या आहेत हे अद्याप बघितलेले नाही. मात्र, निश्चित त्या नाराज असल्याचे वाटत नसून, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी नक्कीच गांभीर्याने विचार करतील आणि मोठं पद दिले जाईल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत असं काहीही म्हणण्याचं कारण नाही.