जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेला व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चा खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ताब्यात त्याला घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. तशात दुसरीकडे जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एका मशीद जवळ झोपलेले असतांना तिघांना ताब्यात घेण्यात आले. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. जळगावच्या पोलीस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसापासून जळगावात लपून बसलेला होता. त्याचे नाव अब्दुल हादी अब्दुल रौफ (वय 32 वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. एवढेच नव्हे तर हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या व्यक्तीला अकोला एटीएसचे पथक औरंगाबाद येथे घेऊन गेल्याची माहिती देखील समोर आली आहे.
एटीएस महाराष्ट्रचे मोठ्या प्रमाणात छापे
पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे ,कोहलापूर ,बीड , परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशभरातील 12 राज्यांमध्ये छापेमारी
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने केरळ आणि तामिळनाडूसह देशभरातील 12 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ठिकाणांवर आणि त्याच्या लिंक्सवर छापे टाकले आहेत. पीएफआय, ईडी आणि एनआयएशी संबंधित लोकांवर टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्याच्या प्रकरणात राज्य पोलिस दलाच्या टीमने यूपी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवाया, प्रशिक्षण शिबिरे चालवणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणे अशा व्यक्तींच्या निवासी आणि अधिकृत जागेवर हे छापे टाकले जात आहेत. एनआयएच्या छाप्यामुळे संतप्त झालेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये निदर्शने केली.
















