जळगाव (प्रतिनिधी) आज देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि ईडीच्या पथकाने पीएफआयच्या कार्यालयांवर संयुक्त कारवाई केली. मुळात पीएफआय ही संघटना ही बंदी घातलेल्या सिमी या संघटनेची सुधारीत आवृत्ती असल्याचा आरोप होत असतो. त्यामुळे आता देशांतर्गत सुरक्षेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून सिमीनंतर आता पीएफआयवर बंदी येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
पीएफआय आहे तरी काय?
2006 मध्ये पीएफआय या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या स्थापनेच्या वेळेस नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंटचे विलिनीकरण करण्यात आले. एनडीएफसोबत मनिथा निथी परसराई, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि अन्य संघटनेचे विलिनीकरण झाले होते. या संघटना मुस्लिम कट्टरतावादी संघटना असल्याचे म्हटले जाते. 1992 मध्ये बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर केरळमध्ये 1993 मध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, 2012 मधील केरळ सरकारच्या एका अहवालानुसार, पीएफआय ही संघटना बंदी घातलेल्या सिमी या संघटनेची सुधारीत आवृत्ती असल्याचा आरोप आहे.
पीएफआयचे 20 राज्यांमध्ये युनिट्स
पीएफआय आपल्या सदस्यांच्या संख्येची माहिती देत नाही. तथापि, 20 राज्यांमध्ये त्यांची युनिट्स असल्याचा दावा केला जातो. सुरुवातीला, पीएफआयचे मुख्यालय केरळमधील कोझिकोड येथे होते, परंतु नंतर ते दिल्लीला हलविण्यात आले. ओएमए सलाम हे त्यांचे अध्यक्ष आणि ईएम अब्दुल रहिमन हे उपाध्यक्ष आहेत. PFI चा स्वतःचा गणवेश देखील आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पीएफआय स्वातंत्र्य परेडचे आयोजन करते. 2013 मध्ये केरळ सरकारने या परेडवर बंदी घातली होती. कारण PFI च्या गणवेशात पोलिसांच्या गणवेशाप्रमाणे तारे आणि चिन्हे होते, असे एका मिडिया रिपोर्टमध्ये छापून आले आहे.
पीएफआय आणि सिमी कनेक्शन !
दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याने सिमी या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सिमीने इतर संघटनांच्या माध्यमातून काम सुरू ठेवल्याची चर्चा होती. पीएफआय आणि सिमीचे कनेक्शन असल्याचा दावा सातत्याने केला जातो. पीएफआयच्या स्थापनेच्या वेळेस विलिनीकरण झालेल्या काही संघटना या सिमीशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. तर, पीएफआयचे काही पदाधिकारी हे सिमीचे पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते होते, असाही दावा करण्यात आला होता. पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल रहमान हे यापूर्वी सिमीचे राष्ट्रीय सचिव होते.
तेव्हापासूनच पीएफआयवर सिमीचे दुसरे रूप असल्याचा आरोप
सिमीवर 2001 मध्ये बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून पीएफआयवर सिमीचे दुसरे रूप असल्याचा आरोप होत आहे. इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशीही सिमीचे संबंध आहेत. यामुळेच सिमी आणि पीएफआय यांच्यातील संबंध देखील दर्शविला जातो. कारण अनेक माजी सिमी सदस्य आता पीएफआयमध्ये सक्रिय असल्याचे बोलले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा सरकारने सिमीवर बंदी घातली होती, तेव्हा सिमीच्या माजी सदस्यांनी ही संघटना दुसऱ्या नावाने सुरू केली होती. SIMI वर बंदी घातल्यानंतर 6 वर्षांनीच PFI ची स्थापना झाली होती.
थोडक्यात जाणून घेऊ सिमी इतिहास !
‘स्टुंडट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ या संघघटनेवर दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. 2018 मध्ये या संघटनेवरील बंदीचा कालावधी संपला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी ही बंदी वाढवण्यात आली. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये या संघटनेची 1977 मध्ये स्थापना करण्यात आली होती. जमात-ए-इस्लामिक हिंद या संघटनेची विद्यार्थी संघटना म्हणून सिमीची ओळख होती. भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सिमीचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर 2001 मध्ये बंदी घालण्यात आली होती.