मुंबई (वृत्तसंस्था) रेमडेसिवीर इंजेक्शनचा ६० हजार वायलचा साठा असल्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला रात्री उशीरा बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. यामुळे बीकेसी पोलिस ठाण्यात थेट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजपनेते प्रसाद लाडदेखील तेथे पोहचले. राज्याला रेमडेसिवीर देऊ करणाऱ्या फार्मा कंपन्यांना ठाकरे सरकार त्रास देत असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कोरोनाच्या उपचारांमधये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल ६० हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती. मात्र, शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले.
या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही या इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी डोकानिया यांना विचारला. त्यानंतर राजेश डोकानिया यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ब्रूक फार्मा कंपनीकडे साठा पडून होता. भाजपच्या नेत्यांनी कायदेशीरपणे या इंजेक्शन्सची निर्यात महाराष्ट्रात व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.