नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात १० वर्षे वास्तव्य केलेल्या एका अफगाणी नागरिकाचा शस्त्रांसह फोटो व्हायरल झाल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. हा अफगाणी नागरिक टुरिस्ट व्हीसावर भारतात आला होता. मात्र त्याचा व्हीजा संपल्यावरही बेकायदेशीररित्या भारतातच होता. याबाबत नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २ महिन्यांपूर्वी त्याला ताब्यात घेतलं होतं. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अफगाणिस्तानला पाठवून दिलं.
व्हायरल झालेला फोटोबद्दल नागपूर पोलिसांना विचारणा केली असता, त्या फोटोत दिसणारी व्यक्ती नूर मोहम्मदच आहे की नाही, ते ठामपणे सांगता येणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. पोलिसांनी नूर मोहम्मदला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये काही तालिबानी व्हिडीओ आढळले होते. तो काही तालिबानी नेत्यांचे ट्विटर हँडल फॉलो करत असल्याचंही पोलिसांना आढळून आलं होतं. याशिवाय नूरच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रणदेखील दिसून आले होते. नूर मोहम्मदनं नागपुरात कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलं नसल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अफगाणिस्तानला परत पाठवण्यात आलं.
दरम्यान, नूर मोहम्मद दहा वर्षांपूर्वी वैद्यकीय पर्यटन व्हिसावर भारतात आला होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो मायदेशी परत गेला नव्हता. नूर बेकायदेशीररित्या सुमारे दहा वर्ष नागपुरात वास्तव्यास होता.