अमळनेर (प्रतिनिधी) येथील संत सखाराम महाराज यात्रेसाठी आलेल्या सूरत येथील दोघांना चौघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोख असा २३ हजार ७०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेतल्याची घटना २४ रोजी पहाटे १.१५ वाजता घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरतच्या दिंडोली येथे राहणारे निरंक उर्फ रोहित भगवान पाटील व कृष्णा भरत पाटील हे दोन्ही संत सखाराम महाराजांच्या यात्रेसाठी रेल्वेने २३ रोजी रात्री अमळनेर स्टेशनवर आले. बस स्थानकावर बस नसल्याने ते २४ रोजी पहाटे १.१५ वाजता बौद्ध मंदिराजवळ मुख्य रस्त्यावर उभे होते. या वेळी एक जण दुचाकी (एमएच ५४, ए ३९३) ने आला अन् त्याने या दोघांना कोठे जायचे असे विचारले. तर या दोघांनी सडावण येथे जायचे सांगितल्याने त्याने मला पण सडावण जायचे आहे, असे सांगून दोघांना दुचाकीवर बसवले.
त्यानंतर दुचाकी मुख्य रस्त्याने न नेता गल्ली बोळातून डायमंड सिटी नावाच्या रस्त्याने मोकळ्या मैदानात नेली. तेथे आधीच तीन जण उभे होते. तेथे गेल्यावर त्यांनी चाकू काढून कृष्णाच्या पोटाला लावला. व जे असेल ते काढून द्या म्हणून ते धमकावू लागले. दोघांनी नकार दिल्यावर चौघांनी चापट, लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर दोघांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम काढून पुन्हा अमळनेरात दिसायचे नाही म्हणून त्यांनी धमकी दिली. या संदर्भात निरंक पाटील याने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे करत आहेत.