चोपडा (प्रतिनिधी) लासुर येथील देवी कमळजा माता मंदिराजवळ चोपडा ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसांसह पकडले आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी अवैध शस्त्र आणि काडतूस बाळगत असल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करत एकूण ३१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात १५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री २२.०० वाजेच्या सुमारास लासुर ते सत्रासेन रस्त्यावरील देवी कमळजा माता मंदीराजवळील टेकडीजवळ लासुर, ता. चोपडा, जि. जळगाव येथे दोन आरोपींना गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.
यामध्ये शिवतेज शिवाजी जावळे (वय ३०, रा. चांदापूर्व, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि अक्षय रामदास चेमटे (वय २४, रा. श्रीरामनगर, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून १) ३०,०००/- रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा स्टील कट्टा मॅग्झिनसह, ३००/- रुपये रोख आणि २) १,०००/- रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस आणि २००/- रुपये रोख हस्तगत करण्यात आले. एकूण ३१,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करण्यात आले असल्यामुळे भा.दं.व. कलम ३/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(२)(३) च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली.
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक शशिकांत पारधी, रावसाहेब पाटील, चेतन महाजन आणि निलेश पाटील यांच्या ताब्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नायक शशिकांत पारधी हे करत आहेत.