जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दारूबंदीच्या कायद्यांतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल असताना देखील अवैधपणे दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ४ जणांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने शुक्रवारी १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. यात शेख तोसिफ शेख अफजल (वय -२८ रा. रावेर), अयुब बशीर तडवी (वय ५७, रा. कुसुंबा, ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (वय ४३, रा. अटवाडे ता. रावेर) आणि पिंपळगाव पोलिस ठाणे हद्दीतील मनोहर उर्फ मोहन कोळी (वय ५५,रा. लोहारी ता. पाचोरा) या गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यावर वेगवेगळे दारूबंदीचे गुन्हे दाखल आहे. त्यांच्यावर अनेकवेळा कारवाई करण्यात आल्या. परंतु त्यांच्यात कोणत्याही सुधारणा न होता उलट त्यांनी गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान यांच्यावर आळा घालण्यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत चारही गुन्हेगारांना एमपीडीए कारवाई अंतर्गत जिल्ह्याबाहेरील वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
















