धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाचे जीवन खूप व्यस्त व धोकेदायक झालेले आहे. जीवन पद्धती बदलामुळे श्रमाचे काम आज माणूस करत नाही. म्हणून वेगवेगळ्या व्याधी त्याच्या शरीराला जडतात. या व्याधींपासून मुक्त होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या औषधी खावे लागतात. परंतु नियमित योगासने व प्राणायामाची दिनचर्या असेल तर असा व्यक्ती सुदृढ जीवन जगू शकतो. गेल्या दोन महिन्यापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एम्. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी आर. डी. महाजन व ज्ञानेश्वर पाटील यांनी योग विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील, डॉ. लीना चौधरी, प्रा. गीतांजली भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा एक भाग म्हणून येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई कूडे माध्यमिक विद्यालयात योग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. आर. एन. महाजन, प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमलाल गुलाबदास भाटिया, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ योगशास्त्र विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. सुरेश बागुल व बालकवी ठोंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे व पालकांचे डोळ्याचे पारणे फेडणारे योगाचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवले. यामध्ये सूर्यनमस्कार, वज्रयोग मुद्रा, पद्मयोग मुद्रा, उत्तानपादासन, पद्मासन, वृक्षासन, बटरफ्लाय, त्रिकोणासन, ध्रुवासन, भुजंगासन धनुरासन, शशांकासन, पश्चिमोत्तानासन, वक्रासन, शवासन इ. आसनांचा समावेश होता. कार्यक्रमाची प्रस्तावना एम. ए. योगशास्त्रचे विद्यार्थी आर. डी. महाजन यांनी केली.
पालकांना व विद्यार्थ्यांना प्रा. गीतांजली भंगाळे यांनी योगाबद्दल सविस्तर माहिती दिली. फक्त आसन म्हणजे योग नसून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार धारणा, ध्यान, समाधी या अष्टांगाचा त्याच्यामध्ये असून त्यांचे उपप्रकार व महत्त्व सांगितले. प्रा. इंजि. राजेश पाटील यांनी विद्यापीठामध्ये योग विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व प्रौढांनी त्या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाधिकारी भावना भोसले यांनी योग मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे अंग असून त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी योगा कडे वळून आपले मन व बुद्धी तल्लख ठेवावी, असे सांगितले.
दिव्या परदेशी , चेतना शिंदे या विद्यार्थिनींनी व अशोक चौधरी या पालकानी योग शिबीर त्यांचा साठी जीवनातील अनमोल अनुभव असल्याचे सांगीतले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा. आर. एन. महाजन यांनी योग शिबिर आजच्या धकाधकीचा जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी चिंतन, मनन, ध्यानधारणा, एकाग्रता यासाठी योग महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमांसाठी आमच्या शाळेचे सभागृह वापरावे, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता महाजन, एम. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. आभार आर. डी. महाजन यांनी मानले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. कविता महाजन, ज्ञानेश्वर पाटील, आर. डी. महाजन, पारस महाजन यांनी परिश्रम घेतले.
















