चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील घाटरोड कोळीवाडा भागातील एका राहत्या घरातून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ११ किलो २१४ ग्रॅम गांजासह २ लाख २५ हजार ८२५ रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिला व एका पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील घाटरोड, कोळीवाडा भागात गांजाविक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक के. के. पाटील, नायब तहसिलदार, महसुल चाळीसगाव विकास लाडवंजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, विष्णु आव्हाड, सागर ढिकले, सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार अभिमन पाटील, पोना.भगवान उमाळे, सुभाष घोडेस्वार, दिपक पाटील, विनोद भोई, पोकॉ.विनोद खैरनार, निलेश पाटील, महिला पोलीस सबा शेख, चालक पोलीस नितीन वाल्हे, महेश बागुल यांच्यासह पथकाने आज दुपारी १.५० वाजेच्या सुमारास घाटरोड कोळीवाडा भागातील संशयित आरोपीतांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सुमारे १ लाख ६६ हजार ६२० रूपये किंमतीचा प्लास्टीक गोणीतील एकुण ११ किलो २१४ ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा, उग्रवास असलेला गांजा तसेच एक प्लास्टीक बॉक्समध्ये मिळुन आलेली ५८ हजार ७७० रूपयांची रोकड, २०० रूपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा ईलेक्ट्रीक वजन काटा, २३० रूपये किंमतीचे प्लास्टीकचे पाऊच, असा सुमारे २ लाख २ हजार ८५५ रूपयांचा ऐवज मिळून आला हा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी ५० वर्षीय महिलेसह फरार असलेल्या अजय उर्फ राकेश भिकन चौधरी या दोघांच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांजा व इतर मुद्देमाल बेकायदेशीर विक्री करण्याकरीता जवळ बाळगतांना मिळुन आले म्हणुन एन. डी. पी. एस. ऍक़्ट 1885 चे कलम 8 (क), 20(ब), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सागर ढिकले, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.