चोपडा (प्रतिनिधी) पोलीस उपनिरीक्षक चोर निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा येथील बस स्थानकावर पोलीस उपनिरीक्षक चोरी करून पळ काढत होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 17 एप्रिल बुधवार रोजी चोपडा बस स्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास शेतकरी वसंत उखा कोळी (रा. वाळकी) यांचे 35 हजार रुपये चोरी झाले. दरम्यान चोपडा बस स्थानकावर चोरी होणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळून गेली होती. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यावर पाळत ठेवून त्यांनी वापरलेल्या इंडिगो कारचा (क्र एम एच-४३ एन-२९२८) पाठलाग केला. पाठलाग करत असताना पोलिसांनी चोपडा – धरणगाव रस्त्यावर चोरांना कारसह अटक केली. यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मान्टे (वय-५७, रा, सदर बाजार जालना), श्रीकांत भिमराव बघे (वय- २७ रा. गोपालनगर खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (वय ४३ रा. माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला), रउफ अहमद शेख (वय ४८ रा. महाळस तालुका जिल्हा बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. दरम्यान, यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे.
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पीएसआय जितेंद्र वाल्टे, एकनाथ भिसे व पोलिस कर्मचारी रितेश चौधरी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दीपक माळी, रवींद्र पाटील, पोलिस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.