चंदिगढ (वृत्तसंस्था) पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. या सर्व गोंधळात आता पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, आज होणाऱ्या आमदार गटाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या विरोधात ४० आमदारांनी नाराजी व्यक्त करणारे एक पत्र काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठवले. त्याचाच विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याच निमित्तीने चंदीगड येथे पंजाब काँग्रेस भवनात आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीची माहिती रावत यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर जारी केली. याच बैठकीनंतर अजय माकन आणि हरीश चौधरी यांना केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे राजकीय सल्लागार तसेच माजी DGP मोहंमद मुस्तफा यांचे ट्विट चर्चेत आहे. पंजाबच्या आमदारांकडे साडे चार वर्षांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री निवडण्याची संधी आहे. अर्थातच त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसचे नाहीत असा सूचक इशारा केला. मुस्तफा पुढे म्हणाले, की २०१७ मध्ये पंजाबने काँग्रेसचे ८० आमदार निवडून दिले. तरीही काँग्रेसला आतापर्यंत सीएम लाभला नाही. त्यातही साडे ४ वर्षांत कॅप्टन यांना पंजाबवासियांचे दुख मनातून समजलेले नाहीत. काँग्रेसच्या ८० पैकी ७९ (कॅप्टन यांना सोडून) आमदारांसाठी ही जल्लोष करण्याची संधी आहे अशी टीका त्यांनी केली.