नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा फटका मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट नाही. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत, असा टोला पूनावाला यांनी सरकारला लगावला आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.
“लसींचे कॉकटेल करणे चुकीचे. १८ वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही. ते धोकादायक आहे,” असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच लसीकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता पूनावाला यांनी, “राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात,” असं रोकठोक उत्तर दिलं. वर्षाअखेरीसपर्यंत लसीकरण होईल आणि सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस मिळतील असे सांगितले जात आहे. त्यावर पूनावाला म्हणाले की, “राजकारणी लोक हेच थापा मारतात, आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. हे काही सोपे काम नाही. यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही महिन्याला १० कोटी प्रमाणे वर्षाला ११० ते १२० कोटी होईल. तसेच इतर कंपन्यांच्या आकडेवारीवरून देखील स्पष्ट होईल की किती लस उपलब्ध होईल.” मृत्यूदर कमी असल्याने लॉकडाउन लावला जाऊ नये असंही पूनावाला म्हणाले. १५० देश लसीची वाट पाहात असून मोदी सरकारने लसींच्या निर्यातीला परवनगी द्यायला हवी, अशी मागणीही पूनावाला यांनी केली आहे.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात आपण अपयशी ठरलो आहे का?, त्यावरही पूनावाला यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “सर्वांना अपेक्षा की आम्हाला लस पाहिजे. पण हे काही सोपे नाही. आमच्याकडे आम्ही २० लसी तयार करायचो ज्या १५ कोटीपर्यंत होत्या. पण आता आम्ही कोरोना लसीचे उत्पादन १५ कोटींवर घेऊन गेलो आहे. त्यामुळे इतर लसीचे काही प्रमाणात उत्पादन कमी केले आहे, आम्हाला देशाची काळजी आहे.”
पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको
राज्य सरकारने कोरोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असं मत व्यक्त केलं आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोविशिल्ड ही करोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.
मोदी सरकारने उत्तर दिले नाही
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत. राज्यामध्ये अनलॉकदरम्यान पुण्यामधील निर्बंध शिथिल न करण्यात आल्याने मागील आठवड्यामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुण्यामध्येही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. मात्र पुण्यातील रुग्णसंख्येचा विचार करुन आधी सूट देण्यात आली नसल्याचं दिलासा दिला नसल्याचं सांगण्यात आलेलं. यावरुनचा वाद शांत होत असतानाच आता सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारनेच पुण्याला प्राधान्य क्रमाने लसींचा पुरवठा करण्यासंदर्भात काहीच उत्तर न दिल्याचं म्हटलं आहे.