धुळे (प्रतिनिधी) उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला १८ महिने पूर्ण झालेत. सरकार स्थापनेपासून रोज उठून तीन पक्षांच रिक्षा सरकार चालणार नाही. आपल्याच ओझ्याने सरकार पडेल. आदळ आपट करणाऱ्या भांड्यांच्या तात्पुरता आवाजाचा आनंद एवढेच काय ते सुखाचे क्षण १८ महिन्याच्या कालखंडात भाजपाच्या वाट्याला आले ! भाजपाचा हा सर्व खटाटोप दिल्ली सरकारचे अपयश झाकण्यासाठी व भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठीच आहे, अशी टीका माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हंटले आहे की, भाजपाचे नेते मराठा आरक्षणावर बोलतात. स्वत: नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबद्दल लाखांच्या सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा पुसटसासुध्दा उल्लेख करीत नाहीत. तेंव्हा मात्र थोबाडं बंद करुन गप्प बसतात. मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाचा अनुकूल निकाल येताच भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांची प्रतिक्रीया खुपच बोलकी होती. “आता मराठ्यांना आरक्षण मिळाले. धनगरांच्या आरक्षणाचा विषय आपोआप संपुष्टात आला”. अशीच चर्चा होती. सुधारून वाढवलेला पुढचा भाग म्हणजेच भाजपाच्या १०६ आमदारांमध्ये भाजपच्या तिकीटावर धनगर समाजाचा एकही आमदार विधानसभेत येवू दिला नाही. आपल्याला अडचणीत आणणाच्या विषयावर तोंडात गुळणी धरुन बसायचे आता हे महाराष्ट्रातील जनतेला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे.
देवेंद्र फडणवीस दिवसेंदिवस जास्तीत जास्त नैराश्याच्या गर्देत चालचे आहेत. मोदीजींच्या नंतर आपले काय ? या कल्पनेनेच फडणवीस कासावीस होतात ! कोणी कोणालाही भेटू द्या ! २०२४ मध्ये तर पंतप्रधान मोदीच त्यांचे वक्तव्य ऐकून फडणवीसांच्या आगतीकतेची कीव करावी तेवढी थोडीच आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचे देवेंद्र फडणवीसांना हवे आहे. पण भाजपाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत का ? किंवा चालतील तरी का ? हा खरा प्रश्न आहे. पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रीक निवडणुकांमध्ये मोदींचा चेहरा चालणार नाही. अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीसांच्या पक्षातील मालक लोकांनी घेतली आहे. येथे मालकालाच चालणार नाही. तर, लोलकाला विचारत कोण हो ? प्रशांत किशोर राजकीय स्ट्रॅटेजीस्ट आहेत. निवडणुकीच्या प्रचारांमध्ये कुठली रणनीती आखावी ? सामान्य मतदारांच्या मनात काय आहे ? कदाचीत याचे अचुक मुल्यमापन करत असतीलही. शरद पवारांना देशातील राजकारणाच्या पटावरच्या सॉंगट्या हलवून हातातून गेलेला डाव जिंकणारा नेता म्हणून ओळखतात. रस्त्यावरच्या संघर्षाचा अंदाज बांधण्याच्या जाणकारासोबत राजकीय पटावरील सोंगट्या कशा हलवता येतील यावर चर्चा झाली असल्याचे नाकारता येत नाही. ‘हरलेली बाजी जिंकणारे बाजीगर म्हणून शरद पवारांची ओळख आहे. १० वर्षात १०५ आमदार आणूनही ५६ आमदारांचा मुख्यमंत्री आणि ५४ आमदारांचा उपमुख्यमंत्री करुन आपण राजकारणातील बाजीगर आहेत हे शरद पवारांनी सिद्ध करुन दिले आहे. ज्यांचे १०५ निवडून आले त्यांनी मध्यरात्री बनवलेलं सरकार तिसऱ्याच दिवशी उलथून पडलं. तीन आकडी आमदारांची संख्या असतांनासुध्दा ज्यांना ७० तासापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपद सांभाळता आलं नाही. ते आता २०२४ साली मोदीच पंतप्रधान होतील असे स्वप्नदोष झाल्याप्रमाणे बरळत आहेत. महाराष्ट्रातील जनता अशा लाचार वल्गना गांभीर्याने घेत नाही. याचा अर्थ मोदींना पंतप्रधानांच्या खुर्चीवरुन ढकलून शरद पवार बसतील अशी कल्पनाच मुळी आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते इतकी हास्यास्पद आहे. ज्या सोशल मिडीयाचा वापर करुन २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आले. तोच सोशल मिडीया आता सोशल मीडीया दुरुपयोग केल्याची क्षणोक्षणी आठवण करून देईल. सदोबा पाटलांच्या विरुध्द जॉर्ज फर्नांडीस लोकसभेची निवडणूक लढवीत होते. तेव्हा स.का. पाटील उपहासाने म्हणाले ‘जॉर्ज दिल्ली बहोत दुर है ! जॉर्ज फर्नांडीसांचे मुख्य निवडणुक सुत्रधार आचार्य अत्रे साहेबांनी लगेच संध्याकाळच्या सभेत तोडीस तोड उत्तर दिले ! ‘सदोबा हमारे लिए दिल्ली बहोत दुर है, लेकीन तुम्हारे लिए सोनापूर (स्मशानभुमी) बहौत नजदीक है’ ! समझने वालोंको इशारा कॉफी है !!
पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे भाव अक्षरश: आकाशाला भिडलेले आहे. डिझेलचे भाव वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. परिणामतः दैनंदिन जीवनावश्यक वस्तु सामान्य माणसाच्या क्षमतेपेक्षा कैकपटीने महाग झालेल्या आहेत. सर्वांच्याच कुटूंबाला खाद्यतेल आवश्यक आहे. गरीबाने न्ह्यारीसाठी हातावर घेतलेल्या भाकरी व मिरचीच्या ठेच्यावर टाकायलासुध्दा तेल शिल्लक राहीले नाही. ५ रुपयाचे, १० रुपयाचे गोडेतेलाचे पाऊच ग्रामीण भागात मिळायला लागलेले आहेत. पेट्रोल पंपावर जेमतेम १०० रुपयांच पेट्रोल टाकणारा पंपावर पोहोचल्या बरोबर, पहीली शिवी हासडतो तो ‘अबकी बार मोदी सरकार म्हणणाऱ्यांनाच भाजपावाले इतके बेशरम की, निवडणुकीच्या वेळेला पेट्रोल पंपावर लावलेले अबकी बारचे सरकारी बॅनरसुध्दा काढून घेतलेले नाहीत. याला फुकटेपणा म्हणायचा की, देशातल्या जनतेला ‘धर्माची गोळी देवून व राम मंदीराचा काढा’ पाजण्याची मनोवृत्ती मानायची ? ग्रामीण भागात तसेच झोपडपट्ट्यांमध्ये चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांच्या डोळ्यावर धुराचा दुष्परीणाम होतो. ‘मेरी माँ भी, चुले पे खाना पकाती थी, मैने गरीबी देखी है’ असे बोलून नेहमीप्रमाणे हुकमी अश्रु डोळ्यात आणून स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीवर घोषीत केलेली सबसीडी हसत हसत केव्हा मोडीत काढली. हे अंध भक्तांनाही कळाले नाही. गॅस सिलेंडरचा भाव ४०० रुपयांवरुन ९०० रुपयांवर पोहोचवला. आता पुन्हा ‘त्याच चुली, तेच सरपण आणि तोच धुर आमच्या माय भगिनींच्या नशिबी आला. मोदी सरकारची अश्वासने आणि कार्यक्रम म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे ! भाजपाच्या नेत्यांना गरीबांबद्दल थोडी जरी कणव असेल तरी, महागाईच्या प्रश्नावर एखादे पत्रक तरी काढावे ! उगाच सकाळ संध्याकाळ आघाडी सरकारच्या नावाने नुसती बोंबाबोंब करायची. उद्धव ठाकरे पंतप्रधानांना भेटले ते मुंबईत पोहोचले नाहीत. तोवर आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत. अशी घोषणा करुन सत्तेसाठी भाजपा किती उतावीळ झालेली आहे व हपापलेली आहे. यालाच सत्तेचे भिक्षुक ! म्हणतात ‘तुम्ही वाघाशी मैत्री कराल, पण वाघाने केली पाहीजे ना ? ज्या वाघाच्या शेपटीवर पाय दिला. तो वाघ खरेच मैत्री करेल का ? पण अपरिपक्व, बालीश व अनुभवशुन्य व्यक्ती राजकारणात आल्या की, वाचाळतेमुळे कसे विनोद होतात याची कल्पना महाराष्ट्राच्या जनतेला आली बरे झाले !
कोरोनाच्या काळात मृत्युशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठीचे ‘रेमडीसीवीर’ इंजेक्शन चोरट्या मार्गाने गुजरातकडे घेऊन जाणारा ट्रक महाराष्ट्राच्या पोलीसांनी ताब्यात घेतला. एखाद्या नगरसेवकाप्रमाणे किंवा गावपातळीवरील सरपंचाप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः पोलीस स्टेशनवर रात्री १२ वाजता धाव घेवून पोलीसांशी घातलेली हुज्जत महाराष्ट्राच्या जनतेने उघड्या डोळ्याने पाहीली आहे. ऑक्सीजनच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण हॉस्पीटलमध्ये तडफडून प्राण सोडत होते. त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेल्या हंबरड्याने काळजाचे पाणी-पाणी होत होते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांसाठी महात्प्रयत्नाने शेजारच्या राज्यांतून नागपूर मार्गे आलेले प्राणावयूचे चारही टँकर गूजरातला नेण्याचा आखलेला कुटील डाव, ग्रामीण भागातील अखेरच्या माणसापर्यंत पोहचला आहे. महाराष्ट्रातील जनता मेली तरी चालेल पण शहा शहेनशहांच्या राज्यातील कुत्रसुध्दा मरता कामा नये, अशी महाराष्ट्रातील भाजपवाल्यांची भूमिका आता लपून राहीलेली नाही. असे पत्रक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आज प्रसिध्दीस दिले आहे.