मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसामुळे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिकचा घाटमाथा, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे तापी नदीच्या उगम क्षेत्रात बुधवारी झालेल्या पावसाने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे 41 पैकी 30 दरवाजे उघडून तापी नदीत विसर्ग करण्यात आला. मात्र, नंतर आवक कमी झाल्याने सहा तासांनंतर सकाळी 9 वाजता 16, तर दुपारी 4 वाजता 8 दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे सायंकाळी उशिराने केवळ 8 दरवाजे एक मीटर उंच उघडून 8 हजार 676 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.