नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत डीएमके नेते स्टॅलिन सत्तेत आले आहेत. या दोन्ही नेत्यांना सत्तेत आणण्यासाठी राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांनी डावपेच आखले होते. हे डावपेच यशस्वी झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. जर भाजपाने दोन अंकी आकडा ओलांडला तर आपण संन्यास घेऊ असं ते म्हणाले होते. पण आपलं भाकीत खरं ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर बोलताना त्यांनी आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली असल्याचं ते म्हणाले.
“मला बाहेर पडायचं आहे. राजकीय रणनीतीकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा नाही,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे. प्रशांत किशोर यांनी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून (I-PAC) आपण बाहेर पडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर यांनीच याची सुरुवात केली होती. तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदाने देतील, पण मी संन्यास घेत आहे असं त्यांनी सांगितलं आहे.