नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता दिल्लीतून बेघर करण्याची केंद्राची तयारी सुरु झाली आहे. लोकसभेच्या सभागृह समितीने राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस जारी केली आहे.
गुजरातमधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यातच शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले होते.
संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे.