जळगाव (प्रतिनिधी) नूतन मराठा महाविद्यालयात मराठी विभाग व भारतीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समन्वयक डॉ.के.बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विभागातील (एम.ए.भाग १) विद्यार्थी हनुमान सुरवसे लिखित व दिग्दर्शित एकांकिका…’मारुतीची जत्रा’चे सादरीकरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.ललिता हिंगोणेकर, डॉ.अविनाश बडगुजर, डॉ.राहुल संदानशिव, प्रा.भागवत पाटील,प्रा राकेश गोरसे, उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मान्यवर तसेच अनुभुती इंग्लिश मिडीयम स्कूल चे नृत्य शिक्षक आणि संगीत शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, भुषण खैरनार यांचा सन्मान व स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा.ललिता हिंगोणेकर यांनी कार्यक्रमाची भुमिका स्पष्ट केली. अनुभुती इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी या एकांकिकेचे अफलातून सादरीकरण करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
उत्कृष्ट कथानक,प्रभावी संवाद, लावणी सादरीकरणातील बहारदार नृत्याविष्कार, नायकाचा संघर्ष, मुख्य पात्रासह दुय्यम पात्रांचा चपखल अभिनय, कथानकाला साजेसं संगीत,प्रत्येक पात्राला न्याय देणारी कास्टींग, डोळ्यासमोर जत्रा उभी करण्यास पुरेसं असं नेपथ्य, आणि उत्तम प्रकाशयोजना यांनी एकांकिकेची उंची गगनापर्यंत नेली.
लोप पावत चाललेली लोककला, कलाकारांची उदासीनता, मराठी लोकरंगभुमीकडे रसिक श्रोत्यांनी सोईस्करपणे फिरवलेली पाठ आणि शिक्षणाचे महत्व या सगळ्या गोष्टींचा एकांकिकेत बारकाईने विचार झालेला दिसून आला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ के बी पाटील यांनी सर्व कलावंतांचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन प्रा.रत्नाकर कोळी यांनी आभारप्रदर्शन प्रा.स्वाती कोळी यांनी केले तर प्रसिद्धीची जबाबदारी प्रा.घनश्याम पाटील यांनी पार पाडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.