मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राठोडांची मंत्रिपदावरून गच्छंती होण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपनं वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आता आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यात विलास चव्हाण आणि अरुण राठोड सापडत नसल्यानं या प्रकरणातलं गूढ आणखी वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तसेच मत व्यक्त केले आहे. राठोड मात्र राजीनामा देण्यास तयार नसल्याचे समजते. पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. सत्ताधारी शिवसेना राठोड यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची संधी आयतीच मिळेल.
संजय राठोड यांना ‘मातोश्री’चे अभय असल्याचे चित्र निर्माण झाले. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने राठोड यांची बाजू लावून धरली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतही दोन मतप्रवाह होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. प्रत्येक वेळी फडणवीस यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना अभय दिले होते. या पाश्र्वभूमीवर राठोड यांचा लगेचच राजीनामा घेऊ नये, असा मतप्रवाहही पक्षात आहे. विधानसभेत फडणवीस यांनी आरोप केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांवर झालेले आरोप आणि या मंत्र्यांना कसे पाठीशी घातले याची जंत्रीच सभागृहात सादर करण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. एका युवतीच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी मंत्र्यांचे नाव पुढे येणे, त्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांमध्ये पसरणे, त्यात आवाज असलेली राठोड नावाची व्यक्ती गायब होणे यातून संशयाला वाव मिळतो. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत राठोड यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतल्याचे समजते. आगामी अधिवेशनात राठोड प्रकरण अडचणीचे ठरण्याच्या शक्यतेमुळेच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्याचे समजते.
दबावतंत्र : राजीनाम्यासाठी दबाव येत असल्यानेच संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. समाज आपल्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करून ‘मातोश्री’वर दबाव आणला. कोरोनाचे सारे नियम पायदळी तुडविले. समाज राठोड यांच्या पाठीशी आहे, असे भासवण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे विदर्भ आणि मराठवाडय़ातील समाजाच्या नेत्यांकडून सांगण्यात येते.
पूजाच्या मोबाईलवर राठोडांचे ४५ मिस्ड कॉल्स?
टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड आणखी अडचणीत आले आहेत. कारण ज्यादिवशी पूजाचा मृत्यू झाला, त्यादिवशी तिच्या मोबाईलवर संजय राठोड नावानं ४५ मिस्ड कॉल आले होते, असा खळबळजनक आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय.
















