मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संभाव्य कारवाईचे संकेत दिले. यावेळी त्यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी का बोलावण्यात आले हे स्पष्ट केले. राज्यात ५० हजार रेमडेसिवीरचा साठा येणार, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्र आहे याची माहिती मात्र पोलिसाकडे नव्हती. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्र दाखवले देखील नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा शासकीय कामात हस्तक्षेप होता. त्यामुळे चौकशीत बाधा आली, असे सांगतानाच हे चुकीचे असून पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. या कंपनीकडे असलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता, तर तो एका खासगी पार्टीला देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुक फार्माला केली होती. त्यावर त्याने नकार दिला होता. मात्र, त्यामुळे हा साठा कोणाला दिला जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळे सोडण्यात आलेले नसून त्याने परवानगीचे पत्र दाखवल्याने सोडण्यात आल्याचे वळसे-पाटील म्हणाले. त्यास चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे पोलिसांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले.
मुनगंटीवार यांचं वळसे पाटलांना उत्तर
तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका आश्चर्यकारक आहे. पोलिसांवर दबाव टाकला असं म्हणायचं काहीच कारण नाही. अशीच उदाहरणं द्यायची असेल तर अनेक उदाहरणं देता येतील, अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वळसे पाटलांनी असं बोलणं म्हणजे सरकार किती नीच स्तरावर आलं आहे याचं हे उदाहरण आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीला पोलीस चौकशीसाठी बोलावतात तेव्हा ते एखाद्या आमदार किंवा खासदारांशी संपर्क साधतात आणि ते पोलिसांशी बोलत असतात, अशी सारवासारवही मुनगंटीवार यांनी केली.