जळगाव (प्रतिनिधी) दोन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याची बतावणी करत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली दोघांची साडेसहा लाखांत फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राका पार्कमध्ये पराग प्रभाकर भावसार हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांचा मामे भाऊ भूषण अविनाश भावसार (रा. तिडके नगर उंटवाडी, नाशिक) हा कामानिमित्त त्यांच्याघरी येत जात होता. जून २०२१ मध्ये पराग भावसार घरीच असल्याने त्याला मामेभाऊ भूषण याने दाक्षायणी फायनांनशियल सर्विसेसची कंपनी गेल्या पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहे. ते जळगावात शाखा सुरु करीत असून तु काम करशील का असे विचारले त्यावर पराग हा नोकरीच्या शोधात असल्याने त्याने काम करण्यास होकार देत कामाला सुरुवात केली. सोशल मीडियावर कंपनीचा प्रचार करीत असतांना राजेंद्र पिरन पाटील हे परागच्या संपर्कात आले. भूषण भावसार याने त्यांना सीएसआर फंडबद्दल माहिती देवून तीन कोटी रुपये मंजूर होणार असल्याचे सांगितले. परंतु त्यापुर्वी प्रोसेसिंग फी म्हणून ३ लाख रुपये भरण्यास सांगितले.
राजेंद्र पाटील यांच्यामार्फत ओमप्रकाश मोतीराम पाटील यांनी देखील संबंधित कर्जप्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी प्रोसेसिंग फी भरण्यास होकार देत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी आरटीजीएसद्वारे साडेतीन लाख रक्कम ट्रान्सफर केली. त्याचा पुरावा म्हणून पराग भावसार यांच्या नावाने नोटरी देखील करुन दिली. अनेक महिन्यांचा कालावधी उलटून देखील संबंधित कर्जाबाबत पराग भावसार व दोन्ही ग्राहकांनी भूषण भावसार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. परंतु सुरुवातीला त्यांना काम सुरु असल्याचे सांगत वेळ मारुन नेली. मात्र काही दिवसानंतर त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ओमप्रकाश पाटील व राहुल देवरे यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. मामेभावाने आपल्यासह दोन जणांची फसवणुक केल्याप्रकरणी पराग भावसार याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.