नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
लस आणि ऑक्सिजन सोबत पंतप्रधान मोदी सुद्धा देशातून गायब आहेत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”, असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षांनी देखील सेंट्रल विस्टा प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच कोरोनावरील औषधांवर जीएसटी कर न लावण्याची देेखील मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली होती. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना औषधे, लसी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील असं सांगितले होते.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी.