नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही. मी हार्वडपेक्षा हार्डवर्कला प्राधान्य देतो, हे त्यांचे वक्तव्य बरंच काही स्पष्ट करणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तींची गरज वाटत नाही. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असा त्यांचा आविर्भाव असतो. याचीच परिणती देशातील कोरोना परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात होत असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा यांनी केले.
‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. यावेळी मुलाखतकार करण थापर यांनी पंतप्रधान मोदी बदलतील का?, असा प्रश्न गुहा यांना विचारला. यावर गुहा यांनी, ‘मोदी यांचे व्यक्तिमत्व त्यांना तसे करू देईल का’, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.
देशातील कोरोना परिस्थितीच्या चुकीच्या हाताळणीसाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व हे प्रमुख कारण जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केवळ फायद्याचा विचार करुन मंत्रिमंडळ तयार केले. सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेतही स्वत:च्या मर्जीतील लोकांना स्थान दिले. तर प्रशासनात होयबा अधिकारी आणि नोकरशाहाच आपल्या सभोवताली राहतील, याची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे आताच्या परिस्थितीलाही मोदींचे नेतृत्त्वच जबाबदारी आहे, अशी टीका रामचंद्र गुहा यांनी केली.
व्यक्ती कालानुरूप बदलू शकतात, याचे रामचंद्र गुहा यांनी उद्धव ठाकरे यांचे उदाहरण दिले. उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. फॅसिस्ट विचारसणीत वाढलेले उद्धव अधिक मनमोकळेपणाने विचार करणारे आहेत. एखाद्या व्यक्तीला पंथाचा दर्जा मिळतो, अशा वातावरणामध्ये एका मोठ्या व्यक्तीसोबत उद्धव ठाकरेंनी आयुष्यातील बराच काळ घालवला. पण उद्धव ठाकरे आता बदलले असून वडिलांच्या विचारसणीप्रमाणे न चालता ते राजकीय मार्गावर समतोल राखत चालण्याचा आणि मुख्य प्रवाहातील राजकारणाचा विचार करताना दिसत आहेत. त्यांनी निश्चय करुन आणि यशस्वीपणे हा बदल घडवून आणल्याकचे रामचंद्र गुहा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.