न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे. या भेटीत लोकशाही ते पाकिस्तान आणि कोरोना ते अंतराळ अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जर त्या भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल.
जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत. आपल्या मूल्यांमध्ये समानता आहे. आमचा समन्वय आणि सहकार्य देखील सातत्याने वाढत आहे, असं मोदी म्हणाले. जेव्हा भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेत संकटात सापडला होता तेव्हा भारताला मदत केल्याबद्दल मोदींनी अमेरिकेचे आभारही मानले. त्याचबरोबर अमेरिकन सरकार, कंपन्या आणि भारतीय समुदाय सर्व मिळून भारताला मदत करण्यासाठी एकत्र आल्याचा आवर्जून उल्लेख मोदींनी यावेळी केला.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमापार दहशतवादासंदर्भात पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शविली. भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी आहे. दहशतवादी गटांना पाकिस्तान जर पाठिंबा देत असेल, तर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही हॅरीस यांनी सहमती दर्शविली. कमला हॅरिस यांनी दहशतवादावर पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख करत पाकिस्तानात दहशतवादी गट कार्यरत होते. या गटांनी अमेरिकेच्या सुरक्षा आणि भारतावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी पाकिस्तानला या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले आहे.