नाशिक (वृत्तसंस्था) चुकीची वक्तव्ये करून पंतप्रधानांकडून भारताची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न होतोय. त्यांची अनेक वक्तव्ये देशासाठी लाजिरवाणी आहेत. गोमूत्र तपासणीसाठी आयआयटीत रिसर्च करण्यास सांगेल, असा पंतप्रधान कधीच नसावा, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांनी पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र सोडले.
शहरात अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू असतानाच आज विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. ‘विद्रोही साहित्याची मशाल महाराष्ट्रातील सर्व शहरात, राज्यात जावी. महाराष्ट्रबाहेर जात देशभरात विद्रोही साहित्याचा जागर होण्याची गरज आहे, असं रझा यांनी सांगितलं. आताच्या विद्रोही साहित्यिकांनी नव्या भारताचं स्वप्न पाहायला हवं. त्यासाठी आपली जबाबदारी वेळीच ओळखावी, असं ते म्हणाले.
रझा यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ‘चुकीची वक्तव्य करून भारताची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधानांची अनेक वक्तव्ये देशासाठी लाजिरवाणी आहेत. पंतप्रधानांच्या गैर भाषणाला प्रचंड टाळ्या पडतात. पण, विरोध करायची हिंमत कुणीही करत नाही. हे अतिशय गंभीर आहे. पंतप्रधान काही म्हणाले की, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री, न्यायाधीश आणि शिक्षण मंत्री होकार देतात. मोठ्या विद्यापीठात शोध लावण्यासाठी अनुदान देऊन गोमूत्रातील सोनं शोधलं जातं. यापेक्षा जास्त देशाची बेइज्जती कोणती? असा रोकडा सवाल त्यांनी केला. ‘गोमूत्र तपासणीसाठी आयआयटीमध्ये रिसर्च करण्यास सांगेल असा पंतप्रधान कधीच नसावा,’ असं ते म्हणाले.