नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी दिली. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत” असं राहुल यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू.”
बनवीरपूर गावात युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन कार घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन गाड्यांना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी, “प्रियंका गांधी वढेरा यांना हरगावमधून अटक करण्यात आलीय,” असा दावा आपल्या ट्विटमध्ये केलाय. “शेवटी तेच झालं ते भाजपाला अपेक्षित होतं. ‘महात्मा गांधीं’च्या लोकशाही देशामध्ये ‘गोडसे’ समर्थकांनी भर पावसामध्ये आणि पोलीस दलाच्या तुकड्यांना तोंड देत अन्नदाता शेतकऱ्याला भेटण्यासाठी पोहचलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावमध्ये अटक केली. ही केवळ लढाईची सुरुवात आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो,” असं श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.