धरणगाव (प्रा.बी.एन.चौधरी) प्रा. अशोक वामन भट नावाचे एक वादळ आज काळाच्या पडद्याआड गेले. धरणगाव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातून उप-प्राचार्य म्हणून सेवा निवृत्त झालेले प्रा. भट म्हणजे ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी चालतंबोलतं “देवरुप” होतं. एम. काॅम. बी. एड. असलेले भटसर वाणिज्य शाखेचे निष्णात प्राध्यापक असले तरी कोणत्याही शाखेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी ते मदतीचा अंतीम सहारा होते.
विद्यार्थी – शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या, त्यांच्या मान्यता मिळविण्यासाठी भटसरांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व नितींचा पुरेपूर वापर केला. भल्याशी भला आणि खटाशी खट ही त्याची कार्यपद्धती होती. नकारात्मकता त्यांच्या डिक्शनरीतच नव्हती. संस्थाचालक, अधिकारी, प्राचार्यांशी भांडून, प्रसंगी वाईटपणा घेवून, त्यांनी प्रत्येकाला न्याय मिळवून दिला होता. शासकीय राजमार्ग असो, की पर्यायी खुश्कीचा मार्ग, भटसरांना सारे अवगत होते. शासनाचे सारे जीआर, निर्णय यांची त्यांना इत्यंभूत माहिती होती.
आपल्या साध्ध्यापर्यंत ते हमखास पोहचायचे. प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचे. यासाठी ते कुणाचे मिंधे झाल्याचे मला आठवत नाही. प्रसंगी पदरमोड करुन ते अनेकांची कामे मार्गी लावून देत होते. महाविद्यालयात प्राचार्य कुणीही असो, गरजू, गरजवंतांसाठी भटसर हेच प्राचार्य होते. अनेकांना त्यांनी कपडे शिवून दिले, वह्यापुस्तकं घेवून दिली, अनेकांच्या भाकरीची सोय केली. कुणाचे परीक्षेची फाॅर्म फी भरुन दिली. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी गाडीची तिकिटं काढून दिल्याचं मला माहीत आहे. ते आयुष्यभर वादळासारखे जगले. स्वतःसाठी कमी, इतरांसाठीच जास्त झिजले. त्यांनी स्वतःच्या मुलांसाठी कधी कुणाला शब्द टाकला नाही. मात्र, गोरगरीब, आडल्या – नाडल्यांसाठी अनेकांचे पाय धरायलाही ते मागे पुढे पहायचे नाही. परोपकराचा वसा घेतलेलं हे वादळ, आज ७१ व्या वर्षी शांत झाले.
धरणगाव महाविद्यालयाच्या सुरवातीच्या काळात प्रा. भट धरणगावात आले. ब्राम्हण असले तरी सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी, शिक्षकांत ते असे मिसळले, की अनेकांना ते ब्राह्मण आहेत, हे सांगूनही पटत नसे. प्रा. ए. पी. गायकवाडांसोबत दलित चळवळ, प्रा. आर. एन. भदाणेंसोबत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ त्यांनी अक्षरशः गाजवली. महाविद्यालयात कार्यक्रम असला म्हणजे भटसरांचा पुढाकार हमखास असायचा. त्याकाळी महाविद्यालयात येणारी मुलं थोराळ असत. हट्टेकट्टे, धिप्पाड असत. मात्र, तेही भटसरांसमोर विनम्र होत. कारण त्यांच्या कोणत्या न् कोणत्या कामात भटसरांनी त्यांना मदत केलेली असे. कार्यक्रम सुरळीत पारपडावा यासाठी, भटसर सुरक्षारक्षक बनून सदैव विद्यार्थ्यांतच दिसत. कार्यक्रम प्रसंगी त्यांना खूर्चीवर बसलेलं मी सहसा पाहिलं नाही.
त्या काळी १२ वीसाठी तालुक्यात एकच परिक्षा केंद्र होते, धरणगाव महाविद्यालय. परिसरातील सर्व खेड्यातील विद्यार्थी येथे येत. यात्राच भरायची. परिक्षा घेणं म्हणजे कसरत होती. सुपरवायझर मिळत नसत. ती सारी कसरत प्रा. भटसर करायचे. विद्यार्थ्यांचं हित आणि पर्यवेक्षकांची सुरक्षा याची हमी म्हणजे भटसर. एकावर्षी एका खेड्यावरील अनेक विद्यार्थी त्याचा एक पेपर देवू शकले नाही. भटसरांनी त्याच परिक्षेत त्यांचा विषय बदलवून, त्यांना दुपारच्या दुसऱ्या विषयाच्या पेपरला बसवले. कागदपत्रांची पूर्तता केली. आणि विद्यार्थ्यांचे वर्ष वाचवलं. ते विद्यार्थी भटसरांना कसं विसरु शकतील.? धरणगाव महाविद्यालयात परिक्षा म्हणजे भटसर पॅटर्न अशी ओळख निर्माण झाली आहे. जी आजही त्याच नावाने ओळखली जाते.
भटसर प्राध्यापक आणि माझे वडिल शेतकरी. मात्र, ते दोघं काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. दोघांची अतूट मैत्री होती. आमच्याकडे आल्यावर जिभाऊंशी बोलतांना त्यांना वेळेचं भान नसायचं. संपूर्ण गावाची कुंडली या दोघांकडे होती. भलेभले या दोघांना वचकून असायचे. कारण, स्पष्टवक्तेपणा आणि सत्याचा आग्रह हा त्यांच्या दोघातला समान धागा होता. त्यांच्या बोलण्यात अनेकदा खंत डोकावायची. प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ता, कार्यकर्ताच राहतो, असं ते म्हणत. ही खंत विसरण्यासाठी त्यांनी स्वतःला काही छंद लावून घेतले होते. मात्र, कुणाचं अहित होईल असं कधिही ते वागले नाहीत. मला वडिलकीच्या नात्याने, हक्काने भटू म्हणून आरोळी मारणाऱ्या काही मोजक्या लोकात ते एक होते. भरतवरही त्यांनी उदंड प्रेम केलं. भटसर आमच्या देवरुप परिवाराचे एक सदस्यच होते. हा हक्काचा एक दुवा आज निखळला. काळजात थोडी कालवाकालव झाली. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देईलच, याची मला खात्री आहे. कारण, त्यांचं निस्वार्थ जगणं, त्यांनी अनेकांसाठी केलेली मदत आणि घेतलेले कष्ट त्यासाठी परमेश्वराला गळ घालतीलच.
ll ओम शांती शांती शांती ll