मुंबई प्रतिनिधी । निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अहंता परीक्षा- २०१३ मधील पात्र असलेल्या उमेदवारांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती रखडली आहे. यात मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण ३१८ पोलीस कर्मचाऱ्यांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली असून तत्काळ पदोन्नती करण्याची आवश्यकता असून याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख, अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांस पाठविलेल्या पत्रात निवेदन दिले आहे की पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सन २०१३ मध्ये खात्यामार्फत विभागीय अहर्ता परीक्षा पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतली होती या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती देण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, या यादीप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली नाही. त्यानंतर शासनाने ८७५ पोलीस उपनिरीक्षक पदाची रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस महासंचालकांना नोव्हेंबर २०१९ मध्ये लेखी पत्र दिले होते या पत्रानुसार पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करुन जून २०२० मध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण ३१८ पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती मागून त्यांचे विरुद्ध गुन्हे किंवा विभागीय चौकशी प्रलंबित आहे तसेच संवर्गसाठी देखील माहिती मागविली होती.