जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामात उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल आदी पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले आहेत. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेशीत करावे, अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामात उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल इ. पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले असून वरील पिकांचे पंचनामे तात्काळ होणे अतिशय गरजेचे असून पंचनामे करण्याचे तातडीने आदेशीत करावे, अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य पिक उडीद व मूग आहेत. सदरील कडधान्य पिकाचा खरीप २०२१ ची पेरणी क्षेत्राची माहिती घेतली असता जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाचे २०९११ हेक्टर व मूग पिकाचे २२९२४ हेक्टर लागवड केलेले क्षेत्र आहे. एकट्या जळगाव लोकसभा मतदार संघातील बहुतांश बागायत व कोरडवाहू शेतकरी खरीप हंगामात उडीद व मूगाची पेरणी करत असतात. यावर्षी जळगाव जिल्ह्यात शासनाने दिलेल्या आकडेवारी अनुषंगाने सदरील पिक परिस्थितीत उडीद व मूगाचे पिक पूर्णपणे वाया गेलेले असून शेतकऱ्यांना यापासून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही, असे प्रत्यक्ष पाहणी वेळी लक्षात आले आहे.
या वर्षी खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने ७० टक्के उडीद, मुगाचे पिकाची मर झालेली असून, शेतकऱ्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे. दि. १७ ऑगस्ट २०२१ नंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले पिकाला देखील कोंब फुटलेले आहेत. यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे. खरीप हंगामात उडीद मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल इ. पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले असून वरील पिकांचे पंचनामे तात्काळ होणे अतिशय गरजेचे आहे. आपण तातडीने महसूल व कृषी विभागाचे यंत्रणेमार्फत प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत मिळण्यास पाठपुरावा करणे सोयीचे होईल, असे यात म्हटले आहे.
शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप मधील पिक पेऱ्याची सक्ती नको
ई-पीक पाहणी ॲपबाबत कुठेही शेतकऱ्यांना सक्ती करण्यात येऊ नये कारण की बहुतांश शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप बाबत परिपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. तात्काळ सदरील विषयात लक्ष घालून योग्य ती कारवाई कराल, अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.