बोदवड (प्रतिनिधी) बोदवड रेल्वे स्थानकावर कोरोना पूर्व थांबत असलेल्या सर्व प्रवासी गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा, स्थानकावर पिण्याचे पाण्याची व मलनिस्सारणाची व्यवस्था व्हावी, दिव्यांग बांधवाना रेल्वे लाभार्थी कार्ड मिळावे, या मागण्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने घोषित केल्या प्रमाणे आज सकाळी बोदवड रेल्वे स्थानकावर राष्ट्रीय विकलांग पार्टी व त्यांना पाठिंबा देणारे प्रवासी संघटना, व्यापारी संघटना, पत्रकार संघटना विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेऊन आंदोलकांना स्थानकाबाहेर रोखून ठेवले व रेल रोको होऊ दिला नाही. अखेर या आंदोलनास पाठिंबा देण्यास आमदार चंद्रकांत पाटील यांनी व आंदोलकांनी बॅरिकेट बाजूला करत प्लॅटफॉर्मवर जाऊन पुढे रेल्वे क्रॉसिग गेट जवळ रेल्वे रेल रोको करण्यासाठी रेल्वे रूळानवर उभे राहिले. यावेळी रेल्वे अधिकारी पाठक चर्चा करत या मागणीचा विचार करून वरिष्ठांनकडे अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि आमदार पाटील व आंदोलकांच्या हस्ते निवेदन स्विकारले. यानंतर सुमारे दिड तास सुरू असलेले हे आंदोलन संपले.
बोदवड रेल्वे स्थानकावर कोरोना पुर्व काळात थांबत असलेल्या दादर सेवाग्राम एक्सप्रेस, अमरावती सुरत, अमदाबाद हावडा या सर्व गाड्यांना अपडाऊन थांबा मिळावा दिव्यांग बांधवाना मिळणारे रेल्वे लाभार्थी कार्ड त्वरीत मिळावे, स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व प्रसाधन गृहाची व्यवस्था करावी तसेच बोदवडसाठी आरक्षित तिकीटांसाठीचा तात्काळ कोटा देण्यात यावा, या मागणीसाठी दि. २ जुन २२ व ४आँगस्ट २३ ला मागण्याचे निवेदन दिले होते. तसेच निर्णय न घेतल्यास रेल रोकोचा इशारा दिला होता. यावर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी सकाळी घोषित केल्याप्रमाणे सकाळी ७:३० वाजता आंदोलनकर्ते रेल्वे स्थानकाकडे आले. मात्र रेल्वे प्रशासनाने आधीच कडेकोट बंदोबस्त करून ठेवला होता.
रेल्वे प्रशासनाने प्रवेश द्वाराजवळ बैरिकेट लाऊन जाण्याचा मार्ग बंद केला करत आंदोलकांना बाहेर रोखले. त्याठिकाणी आंदोलक आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याशी स्थानकात शिकण्याच्या मुद्द्यावर वादावादी सुरू झाली. मात्र, आंदोलकांना ज्यात दिव्यांग पुरूष व महिला सुध्दा होत्या. सुरक्षाबलांनी त्यांना पण आत जाऊ दिले नाही. दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यासह आंदोलनस्थळी पाठिंबा देण्यासाठी आले. त्यांनी सुध्दा बंदोबस्तात असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतू त्यांनी स्थानकावर येण्यास परवानगी दिली नाही. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अरूण कुमार पाठक यांनी आंदोलकाचे निवेदन घेण्याची तयारी दाखवली. मात्र, आमदार पाटील व आंदोलक रेल्वे स्थानकावर प्रवेश घेण्याच्या आपल्या मागणीवर ठाम होते. हा घटनाक्रम घडत असतांना महाराष्ट्र एक्सप्रेस फलाटवर आली आणि आमदार व आंदोलक संतप्त झाले व त्यांनी बैरीकेट लोटून आतमध्ये धाव घेतली. पंरतु तोपर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस निघून गेली.
त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना सर्वानी धारेवर धरले व रेल्वे क्रासींग गेट जवळ रेल रोको करण्याचा निर्णय घेत आमदारासह आंदोलक रूळावर जाऊन उभे राहिले व स्थानकावर उभी असलेली मालगाडी जाऊ देणार नाही, अशी भुमिका घेतली. यावेळी पुन्हा एकदा वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक पाठक यांनी चर्चा करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे आदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आंदोलक व आमदार पाटील यांच्या हस्ते निवेदन पाठक यांनी स्विकारले.
या आंदोलनात राष्ट्रीय विकलांग पार्टी प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड, प्रवासी संघटनेचे बिहारी आहुजा, विकास कोटेचा,डॉ. मुथा,डॉ. संदीप जैन सुरेश वर्मा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल , राजेश नानवानी, गिरधारी पंजवानी राष्ट्रीय काँग्रेस विरेंद्रसिह पाटील चे बाबुराव बढे डॉ. सुधीर पाटील दिलीप पाटील भाजपाचे नरेश आहुजा, रामु आहुजा धनराज सुतार नगराध्यक्ष आनंदा पाटील अफसर खान देवेंद्र खेवलकर गोलू बरडीया हर्षल बडगुजर नितीन चव्हाण यासह पत्रकार संघटनेचे व इतर संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.रेल रोको होऊ नये म्हणून आर पी एफ, जी.आर.पी आणि बोदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलकाना रोखण्यासाठी लावलेला बंदोबस्तात असलेल्या पोलीस दलाने तिकीट असलेले प्रवासी व नातलगांना घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना टिकीट असल्यावर सुध्दा प्रवेश दिला नसल्याने गाडी सुटली तर गाडीतून उतरलेल्या प्रवाशांना काही काळ स्थानका बाहेर येता आले नाही. तसेच परिसरामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाधारकाना थांबू न दिल्याने प्रवाशाची गैरसोय झाली.